Ad will apear here
Next
शिवपत्नी महाराणी सईबाई
पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन. 
.........
‘राव वणंगपाळ बारा वजीराचा काळ’ अशी म्हण ज्यांच्या शौर्यामुळे पडली, त्या शूर वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या पोटी सईबाई राणीसाहेबांचा जन्म झाला होता. फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक घराणे होय. त्यांची सोयरीक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्त्वाचे मानले गेले. 

एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार ज्यांची सय (आठवण) काढेल, त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे राजांचे पहिले प्रेम. शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते. तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते. सईबाई राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना एकोणीस वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांच्याबरोबर झाले होते. लग्नात राजे १० वर्षांचे, तर सईबाई राणीसाहेब सात वर्षांच्या होत्या. 

स्वराज्य उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या, प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांना आपल्या पत्नीच्या पाठिंब्याशिवाय लढता येणे शक्य नव्हते. सईबाई राणीसाहेब या अत्यंत शांत, सोशिक व सामर्थ्यवान होत्या. त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे व माहेरच्या संस्कारामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात व जिजाऊसाहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या. आपल्या माहेरच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने पाहून, स्वराज्याविषयीच्या कर्तृत्वाने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते. स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबर सईबाई राणीसाहेबांनी तितक्याच समर्थपणे पार पाडले होते. 

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच सईबाई राणीसाहेब आपले सुख मानत होत्या. जर छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम असतील, तर सईबाई राणीसाहेब सीता असतील; जर छत्रपती शिवाजी महाराज विष्णू असतील, तर सईबाई राणीसाहेब लक्ष्मी असतील; जर छत्रपती शिवाजी महाराज शंकर असतील, तर सईबाई राणीसाहेब पार्वती असतील, इतके घट्ट प्रेम होते दोघांचे. राणीसाहेबांच्या आठवणीसाठी शिवरायांना एखादे भव्यदिव्य स्वप्न कधीच पाहावे लागत नव्हते. चैत्रातील पालवलेली चिंच जरी पाहिली किंवा भर उन्हाळ्यात आकाशातून कापूस पिंजत जाणारा मेघ जरी एकाकी पाहिला, तरी शिवाजीराजांना सईबाई राणीसाहेबांची आठवण येत होती व आठवणीने राजांचा जीव व्याकूळ होत होता. 

राजे मोहिमेवर असताना ज्या ज्या ठिकाणी ते सुंदर काही पाहायचे तिथे तिथे राजांना उत्कटतेने सईबाई राणीसाहेब यांची आठवण येत होती. राजांच्या या प्रेमामुळेच राणीसाहेबांचे जीवन अनेकविध रंगांनी शोभणाऱ्या इंद्रधनुष्यासारख्या किंवा नवरसयुक्त काव्यासारखे भासत होते. राजे जेव्हा जेव्हा मोहीम फत्ते करून परतत असत, त्या वेळी एखाद्या सामान्य माणसासारखेच राजांनासुद्धा आपल्या घरची ओढ लागत होती. कारण सईबाई राणीसाहेबांना आपल्या विजयाची गाथा ऐकवून त्यांना चकित करण्यासाठी राजे उत्सुक असत. १७-१८ वर्षांचा राजांचा हा अनुभव होता. स्वभावाने गोड आणि लाखात एक या राणीसाहेब होत्या. प्रथमदर्शनीच राजांना त्या खूप आवडल्या होत्या. त्याचे कारण म्हणजे राणीसाहेबांचा मधुर, प्रेमळ स्वभाव. राजांनाच काय, साऱ्या राणीवशालाच त्यांची भुरळ पडली होती. राजे तर आपले सर्वस्वच हरवून बसले होते.  

शिलेदारीचे व्रत पत्करलेले राजे स्वराज्य संस्थापक म्हणून मानाने मिरवत होते. दौलतीच्या विस्तारासाठी मुलूखगिरी करून मोहिमा राबवत होते. मोहिमा जिंकून, यश मिळवत असताना सारे बंध, सारे पाश तोडून टाकल्यासारखे राजे फक्त आणि फक्त स्वराज्यासाठीच झटत होते. तळहातावर प्राण घेऊन काफर यवनावर तुटून पडत होते. राजकारणातील चढ-उतार गुंते सोडवताना कधीकधी स्वतःलाही विसरत होते. स्वराज्यासाठी आपल्या मुलखापासून दूर दूर जात होते; पण तरीसुद्धा सईबाई राणीसाहेबांना ते कधीच विसरू शकत नव्हते. कारण या राणीसाहेब म्हणजे राजांची स्फूर्ती होत्या, स्वामिनी होत्या, देवता होत्या. सईबाईसाहेबांचे प्रेमळ वागणे, लोभस सुंदर रूप यांच्या आठवणीने राजे नव्या त्वेषाने, नव्या जोमाने दुष्मनावर तुटून पडत होते. 

राजांना वाटे, की ‘सईबाई यांच्या लक्ष्मीच्या पावलांमुळेच तर आम्हाला कायम यश मिळत आले आहे. यशश्री आमच्या गळ्यात कायमच हार घालत आहे. भविष्यात हिंदवी स्वराज्याला भरभक्कम आधार देण्यासाठी मला खंबीर साथ सईबाईसाहेबांचीच होती.’ म्हणूनच राजांचे आणि दौलतीचे, स्वराज्याचे सारे लक्ष या राणीसाहेबांकडेच होते. 

सईबाईराणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या, तर कदाचित संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहासच बदलला असता. 

राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षांचे शंभूराजे आईविना पोरके झाले. छत्रपतींच्या संसाराची कथा जिवाला चटका लावणारी ठरली. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघून गेल्या; पण जाताना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण केला. या छाव्याने पुढे रुद्रावतार धारण करून औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले. 

पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन. 

सईबाई राणीसाहेब म्हणजे 
एक पावन पणती, 
जिने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात सुखाचे असंख्य दीप उजळले...

हवेची एक सुखद झुळूक,
जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले...

फलटणच्या नाईक-निंबाळकरांची लेक, छत्रपती शिवरायांच्या पत्नी, शंभूमहाराजांच्या माता...

स्वराज्यातील सर्व शिलेदार मावळे, जिजाऊंच्या लेकी व महाराष्ट्रातील तमाम रयतेकडून स्मृतिदिनानिमित्त सईबाई राणीसाहेबांना विनम्र अभिवादन आणि आमचा मानाचा मुजरा!

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर 

(संदर्भ : शिवपत्नी महाराणी सईबाई)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FXDNCQ
Similar Posts
सरसेनापती हंबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा १६ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
रायाजीराव जाधवराव निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले.
शूरवीर दत्ताजी शिंदे दत्ताजी शिंदे हे अत्यंत शूर व पराक्रमी होते. उत्तरेत लाहोरचा बंदोबस्त दत्ताजी शिंदे यांनीच केला होता. त्या वेळी उत्तरेतील तीर्थक्षेत्रे मुक्त करून आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी दत्ताजी शिंदे यांनी पैसा उभा केला होता. मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे फार मोठे योगदान आहे
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language